Saturday, May 2, 2015
लुटालूट…
एकोणीसशे नव्वद साली हर्षवर्धन फिल्म्स या कंपनीतर्फे चंद्रकांत नाकील आणि मी सुरु केलेला हा विनोदी चित्रपटाचा प्रकल्प.
आज दोन मे २०१५. पंचवीस वर्षे होऊन गेलीत आणि हा चित्रपट आजही प्रोजेक्टरच्या दिव्याच्या प्रकाशाची आस बाळगून कुठेतरी अंधाऱ्या थंड शेल्फवर पडून आहे.
आता कधीही भरून येणार नाही अशी जखम म्हणजे चंदू आज आपल्यात नाही. या दुःखाला पारावर नाही.
रामदास बरकले, यादव खैरनार हे पट्टीचे अभिनेते काळाच्या पडद्याआड गेले.
वाटते, पंचवीस वर्षात महाराष्ट्रात ही प्रचंड बदल झालाय. आता आज हा पंचवीस वर्षे जुना चित्रपट कशाला उकरून काढायचाय? कुणाला बघायचाय तो?
जशा या भावना आणि विचार पाउल मागे खेचतात तशीच मनाला उभारी येते त्या आठवणींनी.. . ज्या उत्साहाने, पोट तिडकीने, अपरंपार कष्टाने आणि भीषण आपत्ती, पैशांची कमालीची चणचण यांना न जुमानता हा चित्रपट पूर्ण व्हावा म्हणून केलेले जीवापाड प्रयत्न पोटाला चिमटा देऊन पंधरा वर्षे न थकता, न सोडता चित्रपटाचा केलेला पाठपुरावा, असंख्य मित्रांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता केलेली डोंगराएवढी मदत.
वाटते, या सर्वांसाठी तरी हे पुनश्च उभारणीचे काम हाती घेतले पाहिजे. त्यातच आहे त्या सर्व आपल्या लोकांना काळजाच्या तळापासून दिलेले धन्यवाद.
श्रद्धांजली.
… आणि यातूनच काहीतरी नवे उभारण्याची दुर्दम्य आशा!
बघूया.
काल एक मे २०१५ रोजी दुपारी पुनश्च लुटालूट कल्पना मनात उगवली. पुढे काय होईल, कल्पना नाही. जितका अंधार पंचवीस वर्षांपूर्वी होता तेवढा आज ही आहे. पण जितकी दुर्दम्य उर्मी तेव्हा होती, तितकीच ती आज ही आहे.
या अंधाराला भेदणारे प्रोजेक्टरच्या प्रकाशाचे किरण हा चित्रपट आजच्या मल्टीप्लेक्सच्या पडद्यावर दाखवतील अशा अमर आशेवर पूर्ण विश्वास ठेऊन पुन्हा एकदा प्रारंभ करतोय…
आशीर्वाद पाठीशी असावा…
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment